मुंबई अहमदाबाद हायवेवर काय खाल? पालघर मध्ये कुठे काय खायचे? Top places to eat at Mumbai Ahmadabad Highway in Palghar

कधी कधी आपल्याला खूप बोर होत आणि आपला लॉन्ग ड्राईव्ह चा प्लॅन बनतो. आपल्या मित्र मैत्रिणीसोबत किंवा पार्टनर सोबत लॉन्ग ड्राईव्ह ला जाण्याची मज्जाच काही और असते. तुम्ही जर् मुंबई ठाण्याला राहत असाल तर तुमच्यासाठी NH ४८ (पूर्वीचा NH ८) मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा एक लॉन्ग ड्राईव्ह साठी खूप चांगला ऑप्शन आहे.
जर तुम्ही राष्ट्रीय महामार्ग ४८ ने प्रवास करत असाल तर तिथे कुठे काय खायचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर मुंबई किंवा ठाण्याहून निघाल्यानंतर घोडबंदर वरून वसई खाडी पार केल्यावर पालघर जिल्हा लागतो. तर
सर्वप्रथम NH ४८ ला वसई तालुका येतो , मग पालघर , डहाणू आणि नंतर तलासरी. घोडबंदर वरून पुढे गुजरातच्या दिशेने येताना काय काय आणि कुठे खायचं ते आपण पाहूया.

१. भजनलाल डेअरी , चिंचोटी-नायगाव, वसई
घोडबंदरहून पुढे आल्यावर चिंचोटी फाट्यावरून राईट टर्न घेऊन कामण रस्त्याला लागा. तिथून लगेच काही अंतरावर ही डेअरी आहे. इथे यांचे रिटेल स्टोर असून तिथे ४८ प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ मिळतात. इथे तुम्ही लस्सी , पेढा , रबडी तसेच पनीर पकोडा असे बरेच पदार्थ ट्राय करू शकता. येथील पदार्थ थोडे महाग आहेत पण एकदा ट्राय करायला हरकत नाही. कारण येथे तुम्हाला भेसळविरहित पदार्थ मिळतील हे नक्की.

२. हॉटेल अल बुराक , वसई
वसई फाट्यावरून पुढे आल्यावर डीमार्ट च्या बाजूला हे हॉटेल आहे. हे यांच्या मुघलाई डिशेस साठी प्रसिद्ध आहे. इथला अँबियन्स खूप छान आहे . यांची सर्विस फास्ट आहे. इथे आम्ही एकदा विथ फॅमिली गेलो होतो. यांच्या मेनू मधील प्लॅटर हा प्रकार नक्की ट्राय करा. फक्त त्या साठी मोठा ग्रुप हवा. आम्ही नॉनव्हेज चिकन प्लॅटर ऑर्डर केला होता. त्यात ७ प्रकारचे स्टार्टर्स , एक ग्रेव्ही , नान, राईस असे पदार्थ होते. क्वांटिटी पण भरपूर होती. एक दोन स्टार्टरस् सोडून बाकी टेस्ट चांगली होती. आमच्याकडून सगळं संपलं तर नाहीच पण पार्सल घेऊन यायला लागलं. याची कॉस्ट ५८०० रुपये ( GST सहित) होती. मोठा ग्रुप असेल तर व्हेज / नॉनव्हेज प्लॅटर हा चांगला ऑप्शन आहे. आम्ही खास हेच खायला गेलो होतो त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही डिशेस आम्ही ट्राय केल्या नाहीत.

३. हॉटेल परी, ढेकाळे, पालघर
विरार फाट्यावरून पुढे आल्यावर ढेकाळे गावाच्या परिसरात हे ढाबा कम हॉटेल आहे. इथे एक काका असतात जे या हॉटेल चे सर्वेसर्वा आहेत. हे हॉटेल २४*७ चालू असते. अत्यंत साधे हॉटेल आहे आणि ट्रक ड्रायव्हर्स रात्रीच्या वेळेस इथे जास्त थांबतात. इथे चहा खूप चांगला मिळतो . चहासाठी म्हैशीचे दूध वापरले जाते. पॅकेट दूध वापरले जात नाही. इथे म्हैशीचे शुद्ध साजूक तूप देखील मिळते. चहासोबत बेसन पापडी मागवा. हे इतके साधे हॉटेल आहे की ड्राईव्ह करताना सहज दुर्लक्षित होते. हे लोकेशन गुगल वर उपलब्ध नाही.

४. साई कृपा घरगुती खानावळ बंटी मामा , हालोली, पालघर
विरार फाट्यावरून पुढे आल्यावर हालोली भागात ही आगरी घरगुती खानावळ आहे. हे देखील साधे हॉटेल आहे आणि येथील मेनू पण लिमिटेड आहे. इथे तुम्ही आगरी चवीच्या नॉनव्हेज डिशेस ट्राय करू शकता. इथे गावठी चिकन हंडी , चिकन लपेटा, लावरी लपेटा , चिकन फ्राय, लावरी फ्राय, बोंबील फ्राय , वाम मसाला, घोळ मसाला, दाढा मसाला, माकली मसाला, घोळ फ्राय, दाढा फ्राय या डिशेस नक्की ट्राय करा. सुरमई , पापलेट, कोळंबी हे मासे देखील तुम्ही ट्राय करू शकता पण ते आपल्याला बाकी हॉटेल्स मध्ये पण मिळतात. पण वाम , दाढा आणि घोळ मसाला / फ्राय मुंबई हॉटेल्स मध्ये मिळत नाही त्यामुळे इथे हे ट्राय करा. आगरी मसाल्यातली गावठी चिकन हंडी मस्ट ट्राय आणि हायली रेकमेन्डेड आहे. जर तुम्ही हे ऑर्डर करत असाल तर यात बटाटे घालायला सांगा. आगरी समाजात किंवा पूर्ण पालघर जिल्ह्यात चिकन मटण हे बटाट्याशिवाय बनवले जात नाही. इथले बोंबील फ्राय पण खूप टेस्टी आहेत. पटकन बनणारी आणि पटकन संपणारी अशी हि डिश आहे. स्टार्टर म्हणून हे मागवू शकता. इथे लावरी तुम्हाला ट्राय करता येईल. लावरी हा एक पक्षी आहे जो कोंबडीपेक्षा लहान असतो. थोडा कडक आणि गरम गुणधर्माचा असतो पण चविष्ट असतो . हा तुम्हाला मुंबईत खूप कमी ठिकाणी मिळेल. जी काही ग्रेव्ही तुम्ही मागवाल त्या सोबत तांदळाची भाकरी मागवा . या भाकरीला ओतवले असे म्हणतात. हे दिसायला डोस्यासारखे असते पण आंबवलेले नसते. इथे हात भाकरी पण मिळेल. ती हि मागवू शकता. चपाती आणि आगरी डिशेस याचा दूरपर्यंत संबंध नाहीये. तुम्ही चपाती लव्हर असाल तर मागवा. ओतवले आल्यावर ते थंड व्हायच्या आत खायला सुरु करा. बराच वेळ तसेच थंड राहिल्यास थोडं चिवट होऊ शकते. आमच्या घरी माश्याचा रस्सा / चिकन / मटण रस्सा आणि ओतवले हे स्वर्ग सुख आहे. त्यात जर बोंबील रस्सा असेल तर क्या बात… हे तुम्हाला पालघर मध्ये काही मोजक्या आगरी हॉटेलात मिळेल किंवा आगरी मित्र मैत्रिणींच्या, लोकांच्या घरी मिळेल.

५. निसर्ग फॅमिली रिसॉर्ट , नागझरी, मनोर, पालघर
मस्तान नाक्यावरून थोडं पुढे गेल्यावर नागझरी गाव लागेल. हायवे वरून राईट घ्या आणि थोडं आत गेल्यावर हे निसर्ग फॅमिली रिसॉर्ट आहे. येथे तुम्हाला घरगुती जेवण ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल. इथे गावठी चिकन , मासे आदिवासी पद्धतीने तुम्हाला बनवून मिळतील . येथे झोपडी स्ट्रक्चर आहे तिथे बसून आरामात फ्रेंड्स फॅमिलीसोबत चिल करता येईल. हे गावठी चिकन साठी प्रसिद्ध आहे. हे लोकेशन गुगल वर उपलब्ध नाही.

६.हॉटेल सम्राट , मनोर, पालघर
मस्तान नाक्यावरून पुढे आल्यानंतर हायवेच्या उजव्या बाजूला हे हॉटेल सम्राट आहे. हे एक चांगले हॉटेल असून येथे पंजाबी , मुघलाई डिशेस चांगल्या मिळतात. येथे रेशमी कबाब, ग्रीन चिकन, चिकन अंगारा विथ मिडीयम ग्रेव्ही अॅन्ड ग्रेटेड एग या डिशेस चांगल्या मिळतात. राजीव गांधी यांचे मित्र आणि काँग्रेसचे माजी खासदार मंत्री मणिशंकर अय्यर एकदा पालघरला एका व्याख्यानाच्या निमित्ताने आले असता त्यांना तेथे डिनर साठी नेण्यात आले होते. त्यांनादेखील तिथले जेवण फार आवडले होते.परंतु आता तेथील मॅनेजमेंट बदलल्याने पुर्वी सारखा दर्जा राहिला नाहीये. त्यामुळे हे हाॅटेल स्किप करु शकता. इथून थोडे पुढे गेल्यावर हॉटेल मनोर इन आहे. तिथे किमा विथ शेपू चांगले मिळते. तसेच शाह आलम या हॉटेलमध्ये ड्राय चिकन / मटण चांगले मिळते.

७.हॉटेल ओम श्री साईराम, तवा, डहाणू
मनोरहून पुढे गेल्यावर डहाणू तालुक्यात मेढवन खिंडीच्या पुढे तवा गाव लागते. इथे आल्यावर फ्लाय ओव्हर न घेता सर्व्हिस रोड ला अगदी फ्लाय ओव्हर च्या खाली हे घरगुती कोळी पद्धतीचे हॉटेल आहे. एक फॅमिलीच हे हॉटेल चालवते. इथे आपल्याला वेळेवर मासे चिकन मटण ऑर्डर प्रमाणे बनवून दिले जाते. तिथल्या ज्या ओनर काकू आहेत त्या स्वतः सगळे पदार्थ घरगुती कोळी मसाल्यात बनवतात. त्यामुळे ऑर्डर यायला थोडा वेळ लागू शकतो. परंतु सगळे पदार्थ चविष्ट असतात. माश्यांच्या उप्लब्धतेनुसार डिशेस ची किंमत कमी जास्त होऊ शकते. आम्ही बऱ्याच वर्षांपूर्वी येथे गेलो होतो. त्या नंतर एक दोन वेळा हॉटेल बंद दिसले . आता हे चालू आहे कि नाही हे तिथे गेल्यावरच समजेल .

८.हॉटेल मल्लिका पॅलेस, चारोटी, डहाणू
जर तुम्हाला खूप घाई आहे आणि स्वस्तात मस्त खायचं असेल तरच हे हॉटेल रेकमेन्डेड आहे अन्यथा नाही. इथे तुम्हाला गरम गरम जेवण सर्व्ह केले जाते. यांची सर्विस खूप फास्ट आहे. इथे व्हेज मध्ये शेव टमाटर , मिक्स व्हेज , दाल फ्राय जीरा राईस व नॉनव्हेज मध्ये चिकन हंडी सोबत चपाती रोटी अस मागवता येईल. चवीला इथले पदार्थ चांगले असतात परंतु खूप अपेक्षा त्या बाबतीत ठेवू नयेत. हे हॉटेल चारोटी नाक्याच्या पुढे गेल्यावर राईटला इंडियन ऑईल एशियन पेट्रोल पंप लागेल त्याच्या अगदी बाजूला आहे. पूर्वी फ्लायओव्हर उतरल्यावर राईट घ्यायला एक कट होता परंतु आता १ km पुढे जाऊन यूटूर्न घेऊन यावे लागते. चारोटी नाक्यावरून राईट घेऊन सर्विस रोडने देखील इथे पोहोचता येईल.

९.न्यू जलाराम काठियावाडी, विव्हळवेढे, डहाणू
चारोटी नाक्यावरून पुढे गेल्यावर विव्हळवेढे महालक्ष्मी मंदिर लागते. आणखी थोडं साधारण १ किमी च्या पुढे हे न्यू जलाराम काठियावाडी हॉटेल आहे. हॉटेल थोडे फॅन्सी आणि महाग आहे. जर तुम्हाला गुजराती फूड आवडत असेल तर इथे जाऊ शकता. हे प्युअर व्हेज हॉटेल आहे . इथे गुजराती लोकांची जास्त गर्दी असते. आम्ही येथे नवरात्रीच्या वेळेस गेलो होतो. खूप गर्दी होती. इथले जेवण मला फार हेवी वाटले. आम्ही शेव भाजी , चीज लसूणी मेथी आणि बाजरी रोटला असा मागवलं होत. चीज अतिप्रमाणात ग्रेट न करता क्युब घातले होते. बाजरी रोटला फार जाड आणि अति तूप लावले होते. त्यानंतर गुजराती कढी खिचडी मागवली होती. दोन्ही पण खूप गोड होते. अशाप्रकारे गोड खायची सवय नसल्याने आम्हाला कुणालाच जेवण आवडले नाही. जर गुजराती/ व्हेज खायचे असेल तर इथे जायला हरकत नाही. वसई खाडी क्रॉस केल्यावर डाव्या बाजूला एक साधे काठियावाडी हॉटेल आहे. तिथे जेवण या न्यू जलारामपेक्षा चांगले मिळते.

१०. डेअरीलॅंड पार्लर – पारसी डेअरी फार्म, वरवाडा, तलासरी
डहाणूवरून पुढे गेल्यावर तलासरी तालुक्यात आच्छाड ला OG प्युअर व्हेज पारसी डेअरी आहे. तलासरी चेक पोस्ट च्या बरेच पुढे हि डेअरी आहे. हि पालघर जिल्ह्यातील सगळ्यात महागडी डेअरी आहे. येथे डेअरी सोबत रेस्टॉरंट आहे. यांचा मेनू बऱ्यापैकी मोठा असून थोडा महाग आहे. येथे तुम्हाला क्वालिटी फूड मिळेल. इथली लस्सी मस्ट ट्राय आहे. जर तुम्ही लंच किंवा डिनर च्या वेळेस गेलात तर इथली थाळी देखील ट्राय करता येईल. संध्याकाळी गेलात तर कांदा भजी आणि चहा घेऊ शकता. इथल्या कुल्फीज पण चांगल्या आहेत. जर त्या पार्सल घेतल्या तर २-३ तास सहज वितळणार नाहीत अशा पॅक करून दिल्या जातात. बाकी देखील बऱ्याचश्या डिशेस ट्राय करा. सुतारफेणी देखील खूप चांगली असते. पण यांची सर्व्हिस खूप स्लो आहे. कधीकधी कंटाळा येईल इतक्या लेट ऑर्डर येते. याव्यतिरिक्त इथला अँबियन्स खूप छान आहे. इथे जुन्या काळातल्या बग्गी पाहायला मिळतील. वेळ असेल तर बाकीचा परिसर एक्सप्लोर करता येईल. मी एकदा एका कामासाठी तलासरीला गेले असता तेथे एका काकांनी हि लस्सी आणली होती. माझ्या आयुष्यातली हि बेस्ट लस्सी होती. त्यानंतर मी बऱ्याचदा पारसी डेअरीला गेले आहे. पण त्या पहिल्या लस्सीची चव अजूनही माझ्या जिभेवर आहे. इथल्या प्रॉडक्ट्स ची एक्सपायरी फक्त तीन दिवस असते.

वर जे काही हॉटेल्स सांगितले आहेत त्यापैकी सम्राट हॉटेल व्यतिरिक्त सगळ्या हॉटेलात मी स्वतः गेले आहे. हा ब्लॉग स्वानुभवातून लिहिला आहे. इथे सगळ्या हॉटेल मध्ये पार्किंगची चांगली सोय आहे. तुम्हाला जर या हायवेवर अशी खाण्याची ठिकाणे माहिती असतील तर आम्हाला नक्की कळवा. आणि
हा ब्लॉग कसा वाटला ते देखील सांगा. धन्यवाद.

स्मिता पाटील- आरेकर
११/१०/२०२५
@agarikolifoods

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *